अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती

सण १९८० पूर्वी महाराष्ट्रात रॅशनॅलिस्ट असोसिएशन, बुध्दिप्रामाण्यवादी मंच, मानवीय नास्तिक मंच, लोक विज्ञान संघटना जमेल त्याप्रमाणे व आपल्या विचारांना अनुकूल वाटेल तेवढे अंधश्रध्दा निर्मूलनाचे कार्य करीत होत्या.

या पार्श्वभूमीवर या विविध संघटनांमधील काही समविचारी मंडळींचे सहकार्य घेऊन प्रा. श्याम मानव यांनी अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीची स्थापना १९८२ साली नागपूर येथे केली. त्यांनी प्राध्यापक व पत्रकारितेची नोकरी सोडून पूर्ण वेळ या कार्यास वाहून घेतल्यामुळे पूर्ण ताकदीने व तडफेने काम करता आले. विविध संघटनामधल्या शेकडो मित्रांचे व नव्याने सामील झालेल्या हजारो कार्यकर्त्याचे सहकार्य लाभत गेले. अगदी चळवळ सुरू करण्याच्या पहिल्या दिवसापासूनच देवावर व धर्मावर हल्ले न करता, मानवी जीवन सुसह्य करणा-या देवावर व धर्मावर हल्ले न करता, उघड अंधश्रध्दा व देवाच्या, धर्माच्या नांवावर लोकांना लुबाडणार्‍या दलालाविरुध्द लढा द्यायचा असा आम्ही निश्चय केला होता.

सुरुवातीला आमच्यातील विविध पुरोगामी विचारांच्या लोकांना “देवा-धर्माला” विरोध न करण्याची भूमिका पचवणे फारच जड गेले. त्यावर वादविवाद होत गेले. पण जसजसे चळवळीचे यश वाढत गेले. जनतेचा प्रतिसाद वाढत गेला, कोणत्याही विचारांची पार्श्वभूमी नसलेले नवखे हजारो कार्यकर्ते चळवळीत सामील होत गेले. तसतशी ही भूमिका कमी विवाद्‌य बनत गेली व चळवळीचा अपरिहार्य भाग बनली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *